नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नामांकित कंपनीत काम करणा-या एका महिलेची बनावट ई मेलच्या माध्यमातून तब्बल दोन लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणूक प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात माहिती अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकाचा मेल असल्याचे भासवून ही रक्कम ऑनलाईन लांबविण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजिरी शेख यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख या शहरातील नामांकित कंपनीत कार्यरत होत्या. गेल्या १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान भामट्यांनी कंपनी मालकाचा डिस्प्ले इन सेव्ह करून त्याद्वारे मंजिरी शेख यांना मेल पाठविला. हा मेल मालकांचा असल्याने शेख यांनी तात्काळ दखल घेत पाहणी केली असता त्यात ग्राहकांना पैसे पाठविण्याचे सांगण्यात आले होते. याच मेलमध्ये यस बँक आणि आयसीआयसी बँक खातेधारकांचा नंबर तसेच युपीआय नंबरही देण्यात आल्याने शेख यांनी आपल्या पतीच्या बँक खात्यातून या रकमा अदा केल्या.
सुमारे दोन लाख रूपयांची रक्कम अदा केल्याबाबत शेख यांनी कंपनी मालकास कळविले असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. महिलेने बँकेत धाव घेत पाठपुरावा केला मात्र पैसे परत न आल्याने तिने पोलिसात धाव घेतली असून. सायबर पोलिसांनी पडताळणीअंती हा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.