नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील शांतीनगर भागात पत्ता सांगितला नाही या कारणातून सराईत गुन्हेगारांनी तरूणावर कोयत्याने हल्ला करीत मोबाईल पळविल्याची घटना घडली. या घटनेत तरूण जखमी झाला असून याप्रकरणी चार जणांच्या टोळक्यावर जबरीचोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश अशोक राजगिरे,करण आण्णा कडुस्कर,आशिष राजपूत आणि हरिओम नामक तरूण अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संकेत राजेंद्र भालेराव (२२ रा.मोरवाडी सिडको) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. भालेराव बुधवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास आपल्या मित्रांबरोबर घराकडे जात असतांना ही घटना घडली. शांतीनगर झोपडपट्टी येथील मनपा शाळेजवळून सर्व मित्र जात असतांना पल्सरवर आलेल्या टोळक्याने पत्ता विचारला. यावेळी संकेत भालेराव याने यांनी माहित नसल्याचे सांगितल्याने हा हल्ला झाला. संशयित टोळक्याने परिसरात दहशत माजवित भालेराव यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रसंगी संशयित राजगिरे याने भालेराव याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. तर कडुस्कर याने जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातील सुमारा दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकाववून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.