पखालरोड भागात घरफोडी; ३८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पखालरोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३८ हजाराचा ऐवज लंपास केला. शेख आवेश अब्रार (रा.साईदर्शन अपा.पखालरोड,द्वारका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख कुटुंबिय गेल्या रविवारी (दि.२०) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली १२ हजाराची रोकड, मोबाईल व शार्प कंपनीचा स्पिकर असा सुमारे ३८ हजाराचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.
५० वर्षीय महिलेची विषारी औषध सेवन करून आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ५० वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना गोसावीवाडी परिसरात घडली. गिता प्रभाकर चव्हाण (रा.पिंपळे सदन,गोसावीवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. चव्हाण यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गिता चव्हाण या महिलेने गुरूवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच मुलगी मोनिका काळे यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.उगले यांनी मृत घोषीत केले. याबाबत प्रणव गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.