नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामनगावरोडवरील माऊलीनगर भागात एकाने घरात घुसून महिलेचा विनयभंग करीत पतीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत पतीच्या हातास गंभीर दुखापत झाली असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. गणेश रंगनाथ राऊत (३२ रा. पॉलीटेक्नीक कॉलेजजवळ,सामनगावरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार संशयित आणि तक्रारदार कुटुंबिय एकमेकांच्या समोरासमोर राहतात. संशयित पीडितेकडे वाईट नजरेने बघत असल्याने तिने आपल्या पतीकडे तक्रार केली होती. त्यानुसार पतीने संशयितास गाठून समज दिली. या रागातून संशयिताने दांम्पत्य घरात असल्याची संधी साधत रविवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास हातात कोयता घेवून पाठीमागील दरवाजाने किचनमध्ये प्रवेश केला. यावेळी घरकाम करणाºया विवाहीतेचा विनयभंग करून त्याने थेट बैठक रूममध्ये बसलेल्या महिलेच्या पतीवर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत कोयत्याचा वार हातावर झेलल्याने पती जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी दांम्पत्याच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.