नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हॅाटेल तपस्वी मागील गितांजली कॉलनीत उघड्या घरात शिरून कपाटाचे लॉकर उघडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रूपये किमतीच्या सात सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. स्नेहल राहूल सावळे (रा.अंबालिका बंगला गितांजली कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साबळे कुटुंबिय २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान आप आपल्या कामात व्यस्त असल्याची संधी साधत चोरट्यांनी उघड्या घरात शिरून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटाचे लॉकर चावीने उघडून त्यातील दहा तोळे वजनाच्या चार व सात तोळे वजनाच्या तीन अश्या सुमारे २ लाख ५५ हजार रूपये किमतीच्या सात सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.