नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तेरा लाख रूपयांचा अपहार करणा-या कॅशरला अटक करण्यात आली आहे. सर्व्हीस स्टेशनमध्ये हा कर्मचारी काम बघत होता. गुरूनाथ मुरलीधर भालेराव (३५) असे अटक केलेल्या कॅशरचे नाव आहे. जमा रक्कम कंपनीच्या नावे न भरल्याने हा प्रकार पुढे आला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित कॅशियरला अटक केली आहे. याप्रकरणी अमोल सखाराम पवार (रा.पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. भालेराव औद्योगीक वसाहतीतील नेक्सा सर्व्हीस सेंटर येथे कॅशियर पदावर कार्यरत आहे. ११ ते २२ ऑक्टोबर दरम्यान सर्व्हीस सेंटरमध्ये जमा झालेली सुमारे १२ लाख ८२ हजार ४९ रूपयांची रक्कम संशयिताने कंपनीच्या बँक खात्यावर जमा करणे अपेक्षीत असतांना त्याने कुणास काही एक न सांगता परस्पर सदर रकमेचा अपहार केला. अधिक तपास चव्हाण करीत आहेत.