नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भगूर येथील विजयनगर भागात हॉटेलमधून जेवण करून बाहेर पडलेल्या दांम्पत्यासह टोळक्याने एकास मारहाण केल्याची घटना घडली. किरकोळ झालेल्या वादातून टोळक्याने पाठलाग करून दांम्पत्याची कार फोडली असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारझोड करून दहशत माजविणा-या संशयित सहा जणांच्या टोळक्यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल जालिंदर शिंदे (रा.बस स्टॅण्ड मागे,भगूर),राहूल विनोद गोयल (रा.संसरी गाव),अक्षय शिवाजी येंदे (रा.शितळा देवी मंदिर भगूर),सतिष जीवप्रसाद (रा.मासिका विहार,दे.कॅम्प),अश्विन सोपान वारूंगसे (रा.डॉमिनोज मागे,दे.कॅम्प) व सागर राजाराम कापसे (रा.धनगर गल्ली,भगूर) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. चित्रा कुणाल घस्ते (रा.गुरू अय्यपन सोसा.अशोकामार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे. डॉ.घस्ते या सोमवारी (दि.२१) पती कुणाल घस्ते व भाऊ कुणाल ललवाणी (रा.नाशिक) यांना सोबत घेवून भगूर येथे गेल्या होत्या. रात्री विजयनगर येथील हॉटेल सम्राट येथील जेवण आटोपून त्या कार पार्क केलेल्या कारच्या दिशेने जात असतांना ही घटना घडली.
भाऊ कुणाल ललवाणी हे मोबाईलवर बोलत कारच्या दिशेने जात असतांना टोळक्याने बेकायदेशीर जमाव जमवून तू कोणाला फोन लावला,कोणाला धमकी देतो असा वाद घातला. यावेळी संतप्त टोळक्याने कुठलेही कारण नसतांना ललवाणी यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी दाम्पत्याने हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. या वादात टोळक्याने डॉ.घस्ते यांच्या एमएच १५ जीए ७४२० या कारची काच फोडून नुकसान केले असून दाम्पत्यासह ललवाणी यांनी टोळक्याच्या तावडीतून सुटका करून घेत कारमधून घराकडे प्रयान केले असता संशयितांनी बघून घेवू अशी धमकी देत एमएच ४६ डब्ल्यू ३४४६ या कारमधून बरेच अंतर पाठलाग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक पाचोरे करीत आहेत.