नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह बुधवारी गोदापात्रात मिळून आला. या मृतदेहावर जखमा आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वीच बेपत्ता तरूणाच्या मित्राने आत्महत्या केली होती. त्यामुळे या घटनेचे गुढ अधिक वाढले आहे. दीपक गोपीनाथ दिवे (वय २७ रा. डी. के. नगर) असे गोदापात्रात मिळून आलेल्या मृत तरूणाचे नाव आहे. दीपक गेल्या बुधवार पासून बेपत्ता होता. गोदापात्र भागात मित्रांसमवेत मद्यपान करीत असतांना अचानक फोन आल्याने तो उठून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्यानंतर त्याच्या पत्नीने गंगापूर पोलिसात तक्रार दाखल दिली होती. बुधवारी सायंकाळी दीपक दिवे याचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना मिळून आला. हे समजताच जिल्हा रुग्णालयात दिवेच्या नातेवाइकांनी गर्दी केली. त्याच्या मित्रांनीच त्याचा घातपात केल्याचा दावा करत पत्नीसह नातेवाइकांनी आक्रोश केला. यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्हा रूग्णालयात तणाव होता. गुरुवारी शवविच्छेदन अहवालानंतर दिवेच्या मृत्यूच्या कारणाची उकल होणार आहे.
तीन दिवसांपूर्वीच बेपत्ता तरूणाच्या मित्राची आत्महत्या
दीपक दिवे याचा मित्र विजय जाधव याने तीन दिवसापूर्वीच विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.