नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात मंगळवारी वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन वृध्द पादचा-यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात वाहनचालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना नाशिक पुणे मार्गावरील पळसे शिवारात घडली. दगडू आप्पा वाघमारे (६५ रा. मुंगी,अहमदनगर) हे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नाशिक पुणे मार्गाने पायी जात असतांना पळसे गावाजवळ सिन्नर कडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच ०५ एबी ५७३८ या स्विफ्ट कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने शिंदे टोलनाका येथील अॅम्ब्युलन्स वरील चालक प्रभाकर उगले यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पाटील करीत आहेत. दुसरी घटना गोविंदनगर येथे घडली. सिडकोतील चंद्रभान शंकर गोसावी (६२ रा.सकाराम अपा.कामटवाडा) हे वृध्द मंगळवारी मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले होते. गोविंदनगर येथील आरडी सर्कल भागातून ते पायी जात असतांना नयनतारा अपार्टमेंट शेजारी त्यांना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नातू संतोषगिरी गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सूरी करीत आहेत.