नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मिळकत ट्रस्टची असल्याची नोटीस लावल्यानंतर ती फाडणा-या तीन जणांचे चित्रीकरण केल्यामुळे नोकरास दमदाटी करुन महिलेने हातातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूपाली उन्हवणे, बादल उन्हवणे आणि आकाश उन्हवणे (रा.उस्मान जमाल सॅनोटोरियम ट्रस्ट लॅमरोड) अशी नोकरास दमदाटी करीत मोबाईल पळविणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विक्रम अशोक पगारे (रा.नवीन स्टेशनवाडी,चंद्रमणीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पगारे हे हानीफ शेख यांच्या माध्यमातून ट्रस्टच्या मिळकतीचे देखभालीचे काम करतात. गेल्या शनिवारी (दि.५) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ही मिळकत ट्रस्टची असल्याबाबतची नोटीस ट्रस्टी शेख यांनी मिळकतीच्या प्रवेशद्वारावर लावली होती. संशयित त्रिकुटाने ही नोटीस फाडण्याचा प्रयत्न केला असता पगारे यांनी त्याचे चित्रीकरण केले. यावेळी महिलेसह दोघांनी विळा आणि कु-हाडीचा धाक दाखवत त्याना दमदाटी व धक्काबुक्की केली. या घटनेत संशयित महिलेने पगारे यांचा सुमारे दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक मुकणे करीत आहेत.