नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याच्या दोन जणांनी नाशिकच्या सब कॉन्ट्रॅक्टरला साडे सत्तेचाळीस लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणूक प्रकारणी न्यायालयाच्या आदेशान्वये उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू बबन काकड (रा.धोंगडेमळा,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रतित शाह व क्रितीका शाह (रा.दोघे समर्थ द कॅपिटल,बाणेर पाशान लिंकरोड,पुणे) असे या ठकबाजांचे नाव आहे. संशयित दोघे टेराफार्म सुपरस्ट्रक्ट एलएलपी कंपनीचे भागीदार असून त्यांनी गेल्या वर्षी काकड यांना गाठून टाटा कंपनीच्या ५५ कोटी ५८ लाख ४७ हजार ४५१ रूपयांच्या कामाचा ठेका मिळाल्याची बतावणी केली होती. या ठेक्याची बनावट कागदपत्र दाखविण्यात आल्याने काकड यांचा विश्वास बसला. त्यांनी या ठेक्यातील काही काम स्व:ताला द्यावे अशी विनंती केल्याने हा गंडा घालण्यात आला. सब कॉन्ट्रक्टर नेमणुकीच्या बहाण्याने भामट्या दांम्पत्याने काकड यांच्याकडून ६३ लाख ४० हजार ०४१ रूपये स्विकारले. ही रक्कम पुणे येथील मिलीयम स्टार बिल्डींग येथील संशयितांच्या कार्यालयात स्विकारण्यात आली. कालांतराने हा प्रकार बनाव असल्याचे लक्षात येताच काकड यांनी पैश्यांची मागणी केली. यावेळी भामट्यांनी काकड यांच्या हातात १६ लाख रूपये देवून उर्वरीत रकमेसाठी काही दिवसांची वेळ मागवून घेत त्यांची बोळवण केली. संशयितांनी दिलेली वेळ टळल्याने काकड यांनी पुन्हा तगादा लावला असता संशयितांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत काकड यांनी पोलिसांचे उंबरठे झिजवले मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाने उपनगर पोलिसांना संशयितांवर फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले असून पोलिसांनी हा गुन्हा दाखल करीत तो पुणे शहरातील बंड गार्डन पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.