नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी साडे तीन लाखाचा ऐवज लंपास केला. या दोन घरपफोडीपैकी एक घरफोडी भरदिवसा करण्यात आली. घरफोडीची पहिली घटना जेलरोड भागात घडली. दिपाली दत्तात्रेय जगताप (रा.गजानन स्पर्श अपा.पार्वतीबाई नगर,पिण्टो कॉलनी मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जगताप या मंगळवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास मुलीस सोबत घेवून कामानिमित्त परिसरातील व्यापारी बँकेत गेल्या असता ही घटना घडली. भरदिवसात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे ७० हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत. दुसरी घटना व्दारका भागात घडली. युशा अल्ताफ मोमीन (रा.अथर्व बंगला,तुलसी आय हॉस्पिटल शेजारी,हॅपी होम कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. मोमीन कुटुंबिय १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून २५ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ८० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाल्याने उघडकीस आली असून दोन चोरट्यांनी ही घरफोडी केल्याचे समोर आले आहे. ही बाब निदर्शनास येताच मोमीन कुटूंबियांनी पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.