नाशिक – मुंबईच्या महिलेच्या नावे असलेले भूखंड बनावट इसार पावतीच्या आधारे भामट्यांनी परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्नेहल सुधाकर कदम (३६ रा.विरार मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी ज्ञानदेव आसाराम कुदळे, हेमंत शांताराम भालेराव, तौसिफ शेख, इम्तियाज व एका अनोळखी महिलेविरुध्द कारवाई केली आहे.
कदम यांचे पाथर्डी शिवारात सर्व्हे नं.२३५ व २०३ मध्ये पाच प्लॉट आहेत. संशयितांनी २१ मे ते ५ जुलै २०२२ दरम्यान सदरचे भुखंड किरण प्रकाश शिंदे यांना परस्पर विक्री करण्याच्या इराद्याने हे कृत्य केले. अॅड. दर्शना खर्डे या महिला वकिलाच्या अभियंतानगर येथील कार्यालयात अनोळखी महिलेस उभे करून मुळ मालक असलेल्या कदम असल्याचे भासवून त्यांच्या नावाने बनावट इसार पावती बनविली. संशयितांची भामटेगिरी लक्षात येताच शिंदे यांनी मुंबईस्थित महिलेचा शोध घेवून संपर्क साधला असता महिलेने नाशिक गाठून पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास उपनिरीक्षक उत्तम सोनवणे करीत आहेत.