नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औरंगाबादरोडवरील जनार्दन स्वामी आश्रम जवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणारी ७२ वर्षीय वृध्दा ठार झाली. अंजनाबाई रामनाथ काकड (रा.जायेगाव ता.सिन्नर) असे मृत वृध्देचे नाव आहे. काकड या गुरूवारी रात्री पती रामनाथ काकड यांच्या समवेत जनार्दन स्वामी आश्रमाजवळील तपोवन बसथांबा भागातील आयकॉन स्टील या दुकानासमोरील रस्ता ओलांडीत असतांना हा अपघात झाला. काकड दांम्पत्य रस्ता ओलांडत असतांना समोरून भरधाव येणा-या दुचाकीने अंजनाबाई यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यांना नजीकच्या समृध्दी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री उपचार सुरू असतांना डॉ.पंकज करंकाळ यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार गायकवाड करीत आहेत.