चावी बनविण्यासाठी बोलविलेल्या दोघांनी सव्वा लाखाचा ऐवज केला लंपास
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात चावी बनविण्यासाठी बोलविलेल्या दोघांनी कपाटातील २५ हजाराच्या रोकडसह दागिणे असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी किसन देवढे (५१ रा.शनि मंदिराजवळ,अंबिका स्विट मागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. देवढे यांच्या घरातील कपाटाची चावी गेल्या काही दिवसांपासून हरवली आहे. त्यामुळे कपाट बंद आहे. सोमवारी (दि.४) दुपारी देवढे घरात असतांना गल्लीतून कुलूप दुरूस्ती करून मिळेल असा आवाज आला. यामुळे देवढे यांनी दोघा तरूणांना घरात बोलावून कपाटासाठी चावी बनविण्यास सांगितले असता ही घटना घडली. भामट्यांनी मास्टर चावीने कपाट उघडून चावी बनविण्याचा बहाणा करीत कपाटातील २५ हजाराची रोकड,सोनसाखळी व शॉट पोत असा सुमारे एक लाख २५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
घरातून मोबाईल चोरीला
नाशिक : कामटवाडा भागात घरात शिरून चोरट्यांनी टेबलावर ठेवलेला मोबाईल चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश नामदेव बाविस्कर (रा.माऊली सदन अपा.अभियंतानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बाविस्कर शनिवारी (दि.२) आपल्या घरात असताना ही घटना घडली. सकाळच्या सुमारास ते बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले असता भामट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून टेबलावर ठेवलेला सुमारे १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.