नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ६८ वर्षीय बंदीवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोहर हरिराम आहुजा असे मृत कैद्याचे नाव आहे. रक्तदाब आणि मधुमेहाच्या आजाराने तो त्रस्त होता. या कैद्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आहुजा गेल्या १८ वर्षापासून रक्तदाब आणि मधुमेहाने त्रस्त होता. पायास गँगरींग झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांचा गुडघ्यापासून पाय काढण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर ते बेशुध्द झाल्याने त्यांना भायखळा येथील जे.जे. रूग्णालयात हलविण्यात आले होते. मुंबईत उपचार सुरू असतांना गेल्या शनिवारी (दि.५) त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.