नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळ्या भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी गंगापूर,सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना काठेगल्लीत घडली. देविदास भास्कर बो-हाडे (रा.टाकळीरोड जुना कथडा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बो-हाडे यांची मोटारसायकल (एमएच १५ जीसी ८८७९) गेल्या २७ ऑक्टोबर रोजी रात्री रविंद्र विद्यालयासमोरील सैफ सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना जुने सिबीएस भागात घडली. राहूल शामसुंदर गायकवाड (रा.निवृत्तीनगर जत्रा हॉटेलसमोर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड हे दि.२८ सप्टेंबर रोजी सिबीएस भागात गेले होते. भूमि अभिलेख कार्यालय आवारात त्यांनी आपली एमएच १५ सीई ६२१७ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत. तिसरी घटना आनंदवली भागात घडली. येथील व्यंकट रामदास निकम (५३ रा.मधुबन अपा.गंगापूररोड) यांची प्लेजर एमएच ४१ एआर ४१९१ गेल्या १५ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार झाडे करीत आहेत.