नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम व्यावसायीकाने मजूराला टेम्पो पाठीमागून दुचाकी घेवून येण्यास सांगितल्यानंतर मजूराने मोटारसायकल घेवून पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र भास्कर सोनवणे (३० रा. पारले कंपनीजवळ,पळसे) असे दुचाकी पळवून नेणा-या संशयित मजूराचे नाव आहे. सोमनाथ गोकूळ मलगुंडे (रा.मंगलमुर्ती नगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. मलगुंडे हे बांधकाम व्यावसायीक असून कन्स्ट्रक्शन कामासाठी त्यांना कामगाराची गरज असल्याने ते गेल्या रविवारी (दि.६) जेलरोड येथील पाण्याच्या टाकीसमोरील नाक्यावर गेले होते. शिवरामनगर येथील बांधकाम साईटवर काम करण्यासाठी त्यांनी भेंडीच्या झाडाजवळ थांबणाºया रोजंदारी काम करणा-या मजूरांशी बोलणी केली. यावेळी त्यांनी संशयित मजूराच्या ताब्यात आपली दुचाकी एमएच १५ सीवाय ७४५१ देवून ते मजूरांना घेवून टेम्पोतून बांधकाम साईटच्या दिशेने रवाना झाले असता ही घटना घडली. टेम्पो पाठीमागून येणा-या दुचाकीस्वाराने अर्ध्या वाटेतून मोटारसायकलसह पोबारा केला असून अधिक तपास पोलिस नाईक डंबाळे करीत आहेत.