नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड लिंक रोडवरील हॉटेल कबीला समोर वादातून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या दोन राऊंड फायर केले. गोळीबार करणा-या आसिफ शेख याने घटनास्थळावर एक मिसफायर झालेला जिवंत राऊंड पोलिसांना मिळून आलेला आहे. अंबड पोलिस हद्दीत हा हवेत गोळीबार बुधवारी रात्री ९.४५ ते १० वाजे दरम्यान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोहेल चौधरी व मुन्ना चौधरी यांचेत स्क्रॅप मटेरियल कमिशन वादातून बुधवारी रात्री ८.३० ते ९ वा दरम्यान रिलायबल वजन काट्या समोर बाचाबाची झाली होती. सदरची बाचाबाची शब्बीर चौधरी हा सोडवण्यास गेला असता गुलाम हुसेन शेख हा त्याच्या साथीदारासह त्या ठिकाणी आला व त्याने शब्बीर यास शिवीगाळ केली. हे भांडण उपस्थित लोकांनी सोडविले. त्यानंतर रात्री ९.४५ ते १० वाजे दरम्यान आसिफ शेख ,अली शेख व त्यांच्यासोबत मुन्ना शेख हे ब्रिजा गाडीमध्ये त्या ठिकाणी आले व गाडीतून उतरून आसिफ शेख (रेकॅार्ड वरील गुन्हेगार) याने हवेत गोळीबार केला व त्या ठिकाणावरून सर्वजण पळून गेले. सदर घटनेमध्ये असिफ शेख याने हवेत दोन राऊंड फायर केल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे. तो व त्याचे साथीदार अली शेख व मुन्ना शेख हे ब्रिझा कारमधून पळून गेले आहेत. या घटनेनंतर अंबड पोलिसांनी भादवी कलम १४३,१४७, १४८,१४९,५०४,५०६ सहकलम शस्त्र अधिनियम ३(२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.