नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी वेगवेगळया भागात छापा टाकत सुमारे सव्वा लाख रूपये किमतीचा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त केला. या प्रकरणी भद्रकाली आणि सातपूर पोलिस ठाण्यात दोन विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एका विक्रेत्यास अटक करण्यात आली आहे. पहिली कारवाई सातपुर गावात करण्यात आली. हॉटेल प्रतिक्षा जवळील रिझवान एजन्सीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात किरकोळ विक्रेत्यांना गुटखा पुरविला जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार सकाळच्या सुमारास पथकाने छापा टाकला असता एजन्सीत विमल, हिरा नामक गुटख्यासह सुगंधी सुपारीचा साठा मिळून आला. या ठिकाणाहून सुमारे २८ हजार ४५ रूपये किमतीचा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त करण्यात आली आहे. एफडीएचे प्रमोद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून परवेज रबूल शेख (रा.राजवाडाजवळ,सातपूर गाव) या विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. दुसरी कारवाई गंजमाळ येथील नितीन ट्रेंडिग या दुकानावर केली. एफडीए पथकाने छापा टाकला असता तेथे सुमारे ९३ हार ८९० रूपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा आणि सुगंधी सुपारी पथकाच्या हाती लागली. या कारवाईत नितीन रघुनाथ येवले या विक्रेत्यास अटक करण्यात आली असून याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमित उत्तमराव रासकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत.