नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चोरीची मोटारसायकल घेवून फिरणा-या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरट्याच्या ताब्यातून दोन चोरलेल्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. तुषार हरिदास चाफळकर (२१ रा.प्रबुध्दनगर,सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. युनिट १ चे पथक पंचवटी परिसरात गस्तीवर असतांना संशयित मिळून आला. कुमावत नगर लगतच्या पाटावरून पेठरोडच्या दिशेने विनानंबर असलेली दुचाकी घेवून जाणा-या चालकास गस्ती पथकाने हटकले असता त्याने पळ काढल्याने संशयित पोलिसांच्या हाती लागला. चोरटा असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शरदचंद्र पवार मार्केट भागात बेड्या ठोकल्या आहेत. संशयिताच्या ताब्यातील एमएच १५ एफअे ६१६९ चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने नंबर खोडून ती वापरत होता. सदर मोटारसायकल चोरीस गेल्याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने ती जप्त केली असून अधिक तपासात त्याने अंबड पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेली एमएच १५ सीई ८२७७ स्कुटीही हस्तगत करण्यात आली आहे. संशयितास मुद्देमालासह पंचवटी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरणार,हवालदार येवाजी महाले,योगीराज गायकवाड,अंमलदार विलास चारोस्कर,राहूल पालखेडे,मुख्तार शेख व गोरक्षनाथ पवार आदींच्या पथकाने केली.