नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉलेजरोड भागात शुक्रवारी सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात रोकडसह लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्राचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण प्रभाकर देशमुख (रा.पोखरनरोड,ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. देशमुख कामानिमित्त शहरात आले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांची होंडा सिटी कार एमएच ४३ एएफ ५८१२ कॉलेज रोड येथील सिनर संकुल भागातील किर्ती सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारच्या खिडकीची काच फोडून लॅपटॉप,ब्ल्यू ट्यूथ स्पिकर,वायरलेस माऊस,पाकिटातील साडे चार हजार रूपयांची रोकड आणि महत्वाची कागदपत्र असा सुमारे ८६ हजाराचा ऐवज चोरून नेला. दुसरी घटना कृषीनगर भागात घडली. एचपीटी कॉलेज पाठीमागे पार्क केलेली अल्टो कार एमएच १५ एफटी ५४९४ चोरट्यांनी फोडली. या कारमधून लॅपटॉप व बँकेची आणि महत्वाची कागदपत्र असा सुमारे ३० हजाराच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. दोन्ही घटनात १ लाख १६ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असून अधिक तपास पोलिस नाईक रविंद्र मोहिते करीत आहेत.