नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर कॉलनीत चावी बनवून देणा-याने कपाटातील रोकडसह दागिणे असा ६६ हजाराचा ऐवज लंपास केला. या चोरीप्रकरणी ललिता बाळासाहेब अहिरे (रा.आठहजार कॉलनी,सातपूर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिरे यांच्या घरातील लोखंडी कपाटाची चावी काही दिवसापासून सापडत नसल्याने त्यांनी भामट्यास घरात बोलावले होते. गेल्या २२ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. दुपारच्या सुमारास गल्लीतून कुलूप दुरूस्ती करून मिळेल, चावी बनवून मिळेल असा आवाज देत जाणा-या इसमास त्यांनी घरात घेतल्याने ही घटना घडली. अहिरे यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट दाखवत भामट्यास ते उघडण्यास सांगितले. यावेळी त्याने चावी बनविण्याचा बहाणा करीत कपाट उघडून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, कानातील झुमरे, वेलजोड आणि १६ हजाराची रोकड असा सुमारे ६६ हजाराचा ऐवज लांबविला. ही बाब निदर्शनास येताच अहिरे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.