नाशिक : देवळाली कॅम्प येथे लग्नास नकार दिल्याने १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मृत मुलीच्या प्रियकरास अटक करण्यात आली आहे. आदित्य उत्तम भालेराव (२१ रा.जुनी स्टेशनवाडी,दे.कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अल्पवयीन मुलगी व संशयिताचे प्रेमप्रकरण होते. शुक्रवारी रात्री दोघे घराशेजारील बंद खोलीत आढळून आले होते. याबाबत मुलीस जाब विचारला असता तिने प्रेमप्रकरणाची वाच्यता करीत संशयित लग्नास नकार देत असल्याचे सांगितले होते. दुस-या दिवशी मुलीने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर युवकाने लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे म्हटले असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक टी.एस.पवार करीत आहेत.