कोरोना काळात सुट्टीवर गेलेला शिक्षाबंदी फरार; गुन्हा दाखल
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना काळात सुट्टीवर गेलेला शिक्षाबंदी न परतल्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याला फरार घोषीत केले आहे. याप्रकरणी प्रकाश कांतीलाल पांचाळ (५४ रा.पिंपरी,मुंब्रा पनवेल रोड ठाणे) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. पांचाळ नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भागत आहे. कोरोना महामारीत कारागृह प्रशासनाने त्यास ३० एप्रिल ते २६ मे २०२२ दरम्यान कोविड १९ अभिवचन रजेवर सोडले होते. सदर कैद्याचा संचित रजेचा कालावधी उटूनही तो न परतल्याने कारागृह प्रशासनाने पोलिसात धाव घेतली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक काकड करीत आहेत.
६६ वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन करून केली आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ६६ वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना मोरेमळा भागात घडली. प्रताप बाबुराव कोळेकर (रा.रामनगर) असे आत्महत्या करणा-या वृध्दाचे नाव आहे. कोळेकर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोळेकर यांनी शुक्रवारी (दि.४) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्यांना तात्काळ सुश्रृत हॉस्पिटल येथे प्रथोमपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.