नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हनुमानवाडी भागात रस्त्यावर वाहन लावल्याच्या कारणातून दोघांनी मायलेकास मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणप्रकरणी रूपेश सुभाष सुर्यवंशी (रा.सार्थक बंगला,चौधरी मळा हनुमानवाडी) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पाटील आणि दिपक पाटील अशी मायलेकांस मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत.
सुर्यवंशी यांनी आपल्या घरासमोरील रस्त्यावर वाहन पार्क केल्याने ही घटना घडली. सोमवारी (दि.३१) रात्री ते आपले वाहन काढून घेत असतांना संशयित सुरेश पाटील यांनी तुला किती वेळा सांगितले रस्त्यात गाडी लावू नको म्हणून या कारणातून वाद घातला. यावेळी दिपक पाटील यानेही धाव घेतल्याने बापलेकाने शिवीगाळ करीत सुर्यवंशी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत सुर्यवंशी यांच्या बचावासाठी त्यांच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त दोघांनी त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत सुर्यवंशी यांच्या आईच्या गळयातील सोन्याचे पोत व कानातील टॉप्स खाली पडल्याने गहाळ झाले असून अधिक तपास पोलिस नाईक बाविस्कर करीत आहेत.