नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी पंचवटी,भद्रकाली आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिलीर घटना काठेगल्लीत घडली. विपूल धनंजय गांगुर्डे (रा.समृध्दी पार्क,काठेनगर काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गांगुर्डे यांची एमएच १५ सिजी १०१९ मोटारसायकल गेल्या २७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. दुसरी घटना मेनरोड भागात घडली. गणेश शिवाजी करंजकर (रा.गजानन कॉलनी,रासबिहारी लिंकरोड) हे ३० ऑक्टोबर रोजी कामानिमित्त मेनरोड भागात आले होते. आरती डिस्ट्रीब्युटर्स समोरील विश्राम बाग कॉम्प्लेक्स भागात त्यांनी आपली एमएच १५ एफएक्स ४६५२ ही दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक रहेरे व आहेर करीत आहेत. तर तिसरी घटना पाथर्डी फाटा येथे घडली. मखमलाबाद येथील हेमंत काशिनाथ तुपलोंढे यांची पल्सर एमएच १५ सीएन ७८१२ गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी पाथर्डी फाटा येथील वाहतूक पोलिस चौकी भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत. चौथी घटन गोदाघाटावर घडली. हिरावाडीतील अरविंद त्रंबक कराटे (रा.वाल्मिक आवास योजना,मारूती मंदिरासमोर) हे मंगळवारी (दि.१) सकाळच्या सुमारास कामानिमित्त गोदाघाटावर गेले होते. दुतोंड्या मारूती जवळ त्यांनी आपली एमएच १५ एफए ६१६९ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.