नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेठफाटा शाखेत कर्मचा-यांचे लक्ष नसल्याची संधी साधत कॅश काऊंटरवर ठेवलेली सतरा लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या चोरीप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक युवराज दौलत चौधरी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी स्टेट बँकेच्या पेठफाटा शाखेचे प्रबंधक असून त्यांच्या देखरेखीखाली बुधवारी (दि.२) दुपारच्या सुमारास कॅशिअर राजेंद्र बोडके यांनी कॅश काऊंटरवर जमा झालेली रक्कम मोजून टेबलावर ठेवली असता ही घटना घडली. दुपारच्या सुमारास बँकेत गर्दी कमी असल्याने कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या लगभगीत असतांना ही घटना घडली. कर्मचा-यांचे लक्ष नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कॅश काऊंटरच्या खिडकीत हात घालून टेबलावर ठेवलेल्या लाखोंच्या बंडलातील काही बंडल चोरून नेले. त्यात १७ लाखाची रोकड होती. जमा रोकड पुन्हा मोजण्यात आल्याने ही बाब निदर्शनास आली असून १७ लाखाची रोकड लंपास झाल्याने प्रबंधकांनी पोलिसात धाव घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बँकेतील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असून त्यानुसार चोरट्यांचा माग काढला जात आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.