बसच्या प्रवासात गर्दीची संधी साधत ८० हजाराचे मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : महामार्ग बसस्थानक ते उमराळे बसमधून प्रवास करीत असतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी प्रवासी महिलेच्या गळयातील सुमारे ८० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हातोहात लांबविल्याची घटना दरम्यान घडली. या चोरीची सुरेखा अशोक टकले (रा.नवसारी,गुजरात) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टकले. मंगळवारी (दि.१) शहरात आल्या होत्या. उमराळे ता. दिंडोरी येथे जाण्यासाठी त्या महामार्ग बसस्थानकात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या उमराणे येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना अथवा प्रवासात त्यांच्या गळयातील सुमारे ८० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र भामट्यांनी हातोहात लांबविले. ही बाब उमराळे येथे बसमधून उतरल्यानंतर निदर्शनास आली. टकले यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस नाईक काकुळते करीत आहेत.
दुचाकीस्वाराने महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र ओरबाडून नेले
नाशिक : विहीतगाव येथे रस्त्यात थांबलेल्या दुचाकीस्वाराने पादचारी नणंद भावजयी पैकी एकीच्या गळय़ातील मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना घडली. या चोरीची वैशाली हेमंत हाडोळे (रा.गणेश चौक,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाडोळे या मंगळवारी (दि.१) विहीतगाव येथे गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या आपल्या भावजयी समवेत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. नणंद भावजयी दादासाहेब हांडोरे चौक ते मथुरा चौक दरम्यानच्या रस्त्याने पायी जात असतांना वाटेतील एका झाडाखाली रस्त्याच्या कडेला मोपेड दुचाकीस्वार उभा होता. दोघी महिला गप्पा मारत भामट्या जवळून जात असतांना त्याने आपले दुचाकी सुरू करीत काही कळण्याच्या आत हांडोळे यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.