घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९५ हजाराच्या ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९५ हजाराच्या ऐवज लंपास केला. देववळाली कॅम्प येथील आनंदनगर भागात ही घटना घडली. या चोरीत सोन्याचांदीच्या दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी पोलिस दप्तरी घरफोडीची नोंद करण्यात आली आहे. मनदिपसिंग मंदरूपसिंग नांदल (रा.विनीपार्क,आनंदरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नांदल कुटुंबिय २० जून ते ४ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे ९४ हजार १९४ रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.
पाय घसरून पडल्याने ७७ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
नाशिक : राहत्या घरात पाय घसरून पडल्याने ७७ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना सिडकोतील उपेंद्रनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश भानूदास बाविस्कर (रा.उपेंद्रनगर,अंबड लिंकरोड) असे मृत वृध्दाचे नाव आहे. बाविस्कर हे गेल्या २६ जून रोजी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पाय घसरून पडले होते. या घटनेत त्यांना मोठी दुखापत झाल्याने मुलगा सचिन बाविस्कर यांनी तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता रविवारी त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.