नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – मातोश्रीनगर भागात ७० वर्षीय महिलेच्या गळयातील सव्वा लाख रूपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. ही वृध्द महिला पतीसमवेत खरेदीसाठी घराबाहेर पडलेली होती. शांताबाई अरविंद रोकडे (रा.प्रगती कॉलनी,उपनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोकडे या शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पती समवेत परिसरात खरेदीसाठी जात असतांना ही घटना घडली. रोकडे दांम्पत्य मातोश्रीनगर येथील महापालिका गार्डन भागातील जलाराम सोसायटीसमोरून पायी जात असतांना शांतीपार्क कडून भरधाव आलेल्या पल्सरवरील भामट्यांनी त्यांच्या गळयातील ४० ग्रॅम वजनाची व सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.