नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथे दारू उधार देण्यास नकार दिल्याने संतप्त दोघांनी दारू दुकानदारास मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीची राहूल संतोषलाल चावला (रा.आनंदनगर) यांनी तक्रार दाखल केली असून पोलिस स्थानकात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंटू भोर (रा.चव्हाण मळा,के.जी.मेहता रोड दे.गाव) व केदू खरात (रा.धोंडगे मळा,तरणतलाव रोड आनंदनगर) अशी दुकानदारास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. या दोघांचा पोलिस शोध घेत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चावला यांचे नाशिकरोड भागात सलोजा कंट्री लिकर शॉप नावाचे दारू दुकान आहे. चावला बुधवारी नेहमी प्रमाणे आपल्या दुकानावर असतांना संशयित तेथे आले. दोघांनी दिवाळी द्या अशी मागणी करीत त्यांना दमदाटी केली. यावेळी दोघांनी उधारीत दारूचीही मागणी केली मात्र चावला यांनी मद्य देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त दोघांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. या घटनेत चावला यांच्या डोक्यास आणि डोळयास दुखापत झाली असून अधिक तपास पोलिस नाईक बेग करीत आहेत.