नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २१ दिवसापूर्वी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगार अक्षय उत्तम जाधव याच्यावर कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांतून ही घटना घडली. या घटनेत जणांना पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले आहे. तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे ही अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.
या घटनेतील मृत अक्षय उत्तम जाधव यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, शासकीय नोकऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे १५ गुन्हे दाखल आहे. यापूर्वी अंबड पोलीस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई करुन २६ डिसेंबर २०२० ते २५ जून २०२१ पर्यंत सहा महिन्याच्या कालावधीसाठी त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. नुकतेच त्याच्या साथीदारांसह त्याला एका गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी ३२ तोळे सोने व साडेदहा लाख रुपये रोख असा घरफोडीचा मुद्देमाल जप्त केला होता. अक्षय हा ८ ऑक्टोबर रोजी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथून जामिनावर सुटला होता. त्यानंतर २१ दिवसांनी ही घटना घडली.
असे झाले भांडण
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तन्मय मनोज गोसावी व आकाश अनिल साळुंखे हे महालक्ष्मी नगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर बसलेले असताना अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. यावेळी त्याचे वाद झाले असता संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव यांच्या डोक्यात वार केला दरम्यान या ठिकाणाहून अक्षय पळून गेला व त्याने या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्यात दिली. अंबड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ पोहोचले व त्यांनी जखमी अक्षय जाधव यास तात्काळ पोलीस गाडीत बसवून जिल्हा रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी अक्षयला तपासून त्यास मृत घोषित केले.
पोलिस घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह गुन्हेशोध पथक व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.