नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे आठ लाखाच्या मुद्देमालावर लंपास केला आहे. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरून नेले. या दोन घरफोडीत एक घरफोडी भरदिवसा झाली आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना दिंडोरीरोड भागात घडली. सौरभ जवाहर जैन (रा.मालती मनोहर अपा.गुलमोहर नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जैन कुटूंबिय बुधवारी (दि.२६) भाऊबीज निमित्त नजीक राहणा-या नातेवाईकांच्या घरी गेले असता ही घरफोडी झाली. अल्पावधीतच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ५ लाख ९१ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६ लाख ५६ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत. दुसरी घटना जुना गंगापूरनाका भागात झाली. येथील दिलीप पोपट बोरस्ते (रा.शारदा सोसा.संजीवणी हॉस्पिटल जवळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोरस्ते कुटुंबिय २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचे कडीकोयंडा व लॅचलॉक तोडून डायनिंग हॉलमधील लोखंडी कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे आणि म्युझिक सिस्टीम असा सुमारे १ लाख २७ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत.