नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीनिमित्त असलेल्या शासकिय सुट्यांची संधी साधत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दारू गोडावून फोडून तब्बल ४ लाख ६८ हजार रूपये किमतीचे महागडे मद्य चोरट्यांनी लंपास केले. या चोरीप्रकरणी एक्साईज विभागाचे जयराम जाखेरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयास लागून असलेल्या आदिवासी कॉलनीत ही घटना घडली. या कॉलनीतील बिल्डींग नं. १ मध्ये एक्साईजचे गोडावून असून छापेमारीत बेकायदा वाहतूक, निर्मीती आणि विक्रीत आढळून आलेला मद्यसाठा या ठिकाणी ठेवला जातो. चोरट्यांनी दारू गोडावून फोडून दिवाळी साजरी केली. गेल्या शुक्रवार (दि.२१) ते गुरूवार (दि.२७) दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडावूनच्या खिडकीचे गज कापून त्यातून ओल्ड बिल एक्स्ट्रा स्पेशल व्हिस्कीचे सुमारे ४ लाख ६८ हजार रूपये किमतीचे ६५ मद्यानी भरलेले बॉक्स चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.