नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा शिवारात भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत २२ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. गोलू रामसुख कोल (रा.हरीकृष्ण हाईटसचे साईडवर,अशोका हॉस्पिटल समोर) असे मृत पादचारी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवक मंगळवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास मेव्हणे राकेशकुमार कोल (रा.सदर) यांच्या समवेत पायी आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. शालक आणि मेव्हणा सावित्रीबाई फुले हॉस्पिटल समोरून हरिकृष्ण हाईटसच्या दिशेने पायी जात असतांना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकीने गोलू कोल यास धडक देत अशोका हॉस्पिटलच्या दिशेने पोबारा केला. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मेव्हणे राकेशकुमार कोल यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.