नाशिक : रेल्वेत टिसीसह वेगवेगळया पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५५ लाखांना तीन जणांनी गंडा घातला आहे. या भामट्यांनी वेबसाईटच्या माध्यमातून बनावट रिझल्ट, जॉयनिंग लेटर आणि मेडिकल रिपोर्ट बनवून बेरोजगारांची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी स्वप्निल राजेंद्र विसपुते (३० रा.एकदंतनगर,अंबड) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावसिंग साळूंखे, मनिषा साळुंखे आणि श्रुतीका साळुंखे अशी ठकबाज त्रिकुटाचे नाव आहे.
संशयित साळुंखे दांम्पत्यासह त्यांच्या मुलीने रेल्वेत मोठ्या ओळखी असल्याचे भासवून विसपुते यांना टिसी या पदावर नोकरी लावून देण्याची ग्वाही दिली होती. या मोबदल्यात विसपूते यांच्या कडून गेल्या १८ सप्टेंबर रोजी पाच लाख रूपये स्विकारण्यात आले होते. यापाठोपाठ सोनाली पाटील यांच्या कडून १३ लाख ७० हजार, पंकज पवार यांच्या कडून १५ लाख मनिषा सुरवाडे यांच्या कडून १० लाख, शिवाजी मगळकर यांच्या कडून ११ लाख रूपये असे ५४ लाख ७० हजार रूपयांची रोकड भामट्या त्रिकुटाने उकळले. काही दिवसातच या त्रिकुटाने बनावट वेबसाईट तयार करून त्यावर वरिल बेरोजगारांचे बनावट निकाल टाकून त्यांचा विश्वास संपादन केला. या पाठोपाठ मेडिकल रिपोर्टही अपलोड करून जॉईनिंग लेटर तयार असल्याचे भासविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात संबधीताची भरती न झाल्याने बेरोजगारांनी चौकशी केली असता हा प्रकार बनाव असल्याचे समोर आल्याने शहरातील बेरोजगारांनी पोलिसात धाव घेतली असून भामट्यांनी अन्य जिह्यातही बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात फसवणुक केल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.