नाशिक : सरकारवाडा पोलिस ठाणा आवारात नैराश्यातून एका तरूणाने मद्याच्या नशेत विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने सदर तरूण बचावला आहे. राजेश विजय भारती (२८ रा.गंगासागर कॉलनी,गंगापूररोड) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन वेळा विवाह ठरूनही मुली लग्नास नकार देत असल्याने आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. दारूच्या व्यसनामुळे मुली त्याच्या समवेत लग्न करण्यास नकार देत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले. आप्तस्वकीयांसह नातेवाईकांच्या मध्यस्थीतून विवाह ठरला जातो. मात्र राजेश वधूच्या भेटीपूर्वीच मद्याच्या नशेत तर्रर्र होवून मुलीशी मोबाईलवर संपर्क करीत असल्याने त्यास दोन मुलींनी नकार दिल्याचे कळते.
भारतीने सोमवारी दुपारच्या सुमारास सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून हे कृत्य केले. मद्याच्या नशेत असलेल्या राजेश भारती याने कुठलेही कारण नसतांना ठाणे अंमलदार कक्षा समोरील आवारात उभे राहून विष प्राशन केले. उपस्थित कर्मचा-यांच्या ही बाब निदर्शनास येताच अधिका-यांसह कर्मचा-यांची एकच धावपळ उडाली.
वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी तरूणास तात्काळ उपचाराच्या सुचना केल्याने पोलिस वाहनातूनच त्यास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने धोका टळल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.