नाशिक – त्र्यंबकरोडवरील जलतरण सिग्नल भागात दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाना शिवीगाळ व धक्काबुक्की करुन चलन यंत्र रस्त्यावर फेकून दिले. या घटनेनंतर या दुचाकीस्वाराला सरकारवाडा पोलिस स्टेशमध्ये नेले असता त्याने पोलिस ठाण्यात गोंधळ घालत एका कर्मचा-यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकीस्वाराला गजाआड करण्यात आले आहे. रितेश अशोक लालवाणी (३० रा.यश व्हिला,मधूकमलनगर सावरकरनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
या प्रकाराची तक्रार शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी साहेबराव गवळी यांनी दिली आहे. गवळी सोमवारी त्र्यंबकरोडवरील जलतरण तलाव सिग्नल भागात सेवा बजावत असतांना ही घटना घडली. विनाहेल्मेट आलेल्या लालवाणी यास अडविल्यानंतर त्याचा संताप झाला व त्याने स्त्यातच दुचाकी लावून त्यांच्याशी हुज्जत घातली. ठक्कर बाजार पॉईट वरील हवालदार संजय जगताप यांनी आपल्या सहका-याच्या मदतीस धाव घेतली असता त्यांनाही त्याने शिवीगाळ केली. अखेर मुंबईनाका पोलिसांनी संशयितास आपल्या वाहनात टाकून सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणले. सरकारवाडा पोलिस चौकशी करण्यापूर्वीच संशयिताने पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचा-यांना शिवीगाळ व आरडाओरड करीत गोंधळ घातला. यावेळी ठाणे अंमलदार कॅबीन जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून त्याने शिपाई योगेश वायकंडे यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने वायकंडेही जखमी झाले असून हल्ला वाचवित असतांना त्यांच्या हातास मोठी दुखापत झाली आहे. संशयितास अटक करण्यात आली असून वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.