नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिडके कॉलनी भागात फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या मुलाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी लंपास केला. या चोरीप्रकरणी मंगेश रत्नाकर वाघमारे (रा.मिलींदनगर,तिडके कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे यांचा मुलगा पियूष हा शनिवारी रात्री शतपावलीसाठी घराबाहेर पडला असता ही घटना घडली. मिलींदनगरकडून एसएसके हॉटेलच्या दिशेने तो फोनवर बोलत पायी जात असतांना पाठीमागून तोंडाला रूमाल बांधून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याच्या हातातील सुमारे १६ हजार २०० रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.