नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या महिलेस एक्स्पोर्टच्या व्यवसायात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एकाने ८५ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यहारात जमिनीचा खोटा दस्त बनवून दिल्याने महिलेने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुल रूपचंद क्रिपलानी (रा.अपोलो बंदर,कुलाबा मुंबई) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. या फसवणूकी प्रकरणाची स्मिता संदिप वडेरा (रा.उदयनगर,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. वडेरा आणि संशयित क्रिपलानी यांची २०१६ मध्ये ओळख झाली होती. या ओळखीतून विश्वास संपादन करीत संशयिताने महिलेस एक्स्पोर्टच्या व्यवसायात चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे विश्वास ठेवून महिलेने ८५ लाख रूपयांची गुंतवणुक केली होती. २०२१ हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे समोर आल्याने संशयिताने या रकमेच्या मोबदल्यात उत्थन ता.जि.ठाणे येथे स्व:ताची शेत जमिन असल्याचे सांगून रक्कम परत न करता त्या मोबदल्यात एक एकर चार गुंठे जमिन वडेरा यांना देण्याचे कबुल केले. त्यानुसार १३ फेब्रुवारी २०२१ मध्ये संशयिताची सर्व्हे नं. २२९ मधील हिस्सा ३ -३ मधील मिळकतीचे लेटर ऑफ द कमिटमेंट (एम.यू) करण्यात आले. त्याबाबतचे खोटा दस्त नोंदणी करणात आले. मात्र कालांतराने सदर मिळकतही संशयिताची नसल्याचे व त्याने विश्वासघात करून खोटा दस्त नोंदणी केल्याचे समोर आल्याने महिलेने पोलिसांचे उंबरे झिजवले. मात्र न्याय न मिळाल्याने तिने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.