नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंद घराचे कुलूप तोडून बेकायदेशीर घरात प्रवेश करुन एका महिलेने घरातील सोफा, चार खुर्च्या, मिक्सर व संसारोपयोगी वस्तू परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. खोट्या केसेस दाखल करून जेलमध्ये पाठविल व तुझी मिळकत हडप करीन अशी धमकी या महिलेने दिल्यामुळे हा सर्व प्रकार पोलिस स्थानकात पोहचला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल गवळी असे संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अमोल पुरूषोत्तम भालेराव (रा.जागृतीनगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. भालेराव यांचे म्हसरूळ गावातील एका सोसायटीत सदनिका असून गेल्या ६ मार्च रोजी संशयित महिलेने बंद घराचे कुलूप तोडून बेकायदेशीर घरात प्रवेश केला. या घटनेत महिलेने भालेराव यांच्या घरातील सोफा, चार खुर्च्या, मिक्सर व संसारोपयोगी वस्तू परस्पर विक्री केल्या. याबाबत माहिती मिळताच भालेराव यांनी तिला जाब विचारला असता संशयितेने मी महिला असून तू जर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर खोट्या केसेस दाखल करून जेल मध्ये पाठविण आणि सदरची मिळकत हडप करून घेईल अशी धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या भालेराव यांनी पोलिसांत धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.