नाशिक : ध्रुवनगर भागात धावत्या ट्रॅक्टरवरून पडल्याने पाच वर्षीय बालकाचा चिरडून मृत्यू झाला. राघव दिनकर शिंदे (रा. शिंदे चाळ,बारा बंगल्या शेजारी ध्रुवनगर) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेत राघव ट्रक्टरच्या पाठीमागील मोठ्या चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ काका भैरवनाथ शिंदे यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. पण, त्याचे प्राण वाचले नाही.
राघव रविवारी दुपारी आपल्या वडिलांसमवेत पाण्याचे टँकर असलेल्या ट्रॅक्टरवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. राघव वडिल दिनकर शिंदे यांच्या डाव्या बाजूला नेहमी प्रमाणे बसला होता. दोघे बापलेक खंडेराव मंदिराच्या दिशेने प्रवास करीत असतांना निलय बंगल्याजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चालक दिनकर विश्वनाथ शिंदे (३८) यांच्याविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.