नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वर्दळीच्या नाशिक – पुणे मार्गावर सराफी दुकान फोडून चोरट्यांनी चांदीच्या भांड्यासह देवीदेवतांच्या मुर्त्या चोरून नेल्या. या चोरीप्रकरणी राजू दत्तू देवकर (रा.रविशंकर मार्ग,अशोकामार्ग) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकर यांचे नाशिक पुणे मार्गावरील ममता आनंद संकुल येथे राज ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.१९) रात्री राज ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी शोकेश तोडून त्यातील चांदीची भांडी व देवीदेवतांच्या मुर्त्या असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रविण चौधरी करीत आहेत.