नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील पंडीत नगर भागात बाहेरगावी नातेवाईकाच्या अंत्यविधीस जाण्यास सांगितल्याने संतप्त मुलाने पित्यावर चाकु हल्ला करत बेदम मारहाण केली. या घटनेत वडिल जखमी झाले आहे. वैभव वरकड (२२ रा.पंडीतनगर,सिडको) असे आपल्या वडिलांवर चाकू हल्ला करणा-या संशयित मुलाचे नाव आहे. या हल्याप्रकरणी विठ्ठल वरकड (४२ रा.खंडोबा मंदिराजवळ) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताची बाहेरगावी राहणारी आजी वारली असून बुधवारी (दि.१९) रात्री वडिलांनी त्यास गावी जाण्याचे सांगितले असता त्याने नकार दिला. त्यामुळे वडिलांनी मीच जावून येतो असे म्हणत पैश्यांची मागणी केल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत बापास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत संशयिताने आपल्या वडिलांच्या पाठीवर व खांद्यावर धारदार चाकूने वार केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.