नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद येथील शांतीनगर भागात सोलर पॅनलचे काम करीत असतांना पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सोमवारी (दि.१७) ही घटना घडली होती. यात बाळकृष्ण दगडू मिस्तरी (६५ रा.स्वामी विवेकानंदनगर,सिडको) हे पॅनल फिट करीत असतांना ते पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत ठेकदार मोहन दगडू मिस्तरी (रा.स्वामी विवेकानंदनगर,सिडको) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मृत आणि ठेकेदार सख्खे भाऊ असून, संशयिताने वृंदावन संकुल सोसायटीवर सोलर पॅनल बसविण्याचे काम घेतले होते. मृत इमारतीच्या डक वरील सिमेंट पत्रा तुटल्याने बाळकृष्ण मिस्तरी हे डक मध्ये पडले होते. गंभीर अवस्थेत उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदार असलेल्या भावाने सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा न पुरविता निष्काळजीपणे त्यांना काम करण्यास भाग पाडल्याची तक्रार मृत कामगाराचा मुलगा गजानन मिस्तरी यांनी केला असून अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.