नाशिक : आदलाबदलीत दिलेल्या स्कार्पिओ वाहनाची एकाने परस्पर विक्री केल्याप्रकरणी सातपुर पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पांडूरंग काळू वाकसरे (रा.तळवाडे ता.त्र्यंबकेश्वर) यांनी तक्रार दाखल केली आहे. रोहिदास केशव आहिरे (रा.मखमलाबाद) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार आणि संशयित एकमेकांचे मित्र असून त्यांनी एकमेकांची वाहने आदलाबदल केली होती. वाकसरे यांची चार लाख रूपये किमतीची स्कार्पिओ एमएच १५ डीएस ७९९८ या वाहनाचा ताबा आहिरे यास देण्यात आला होता. तर आहिरे याची इर्टिका एमएच ०५ जीएल ३६५१ चा ताबा वकसरे यांच्याकडे ठेवण्यात आला होता. या आदलाबदलीच्या व्यवहारात वाहन कर्जाचे हप्ते दोघे भरणार होते व त्यानंतर ते गाड्या एकमेकांच्या नावावर करून देणार होते. परंतू आहिरे याने कालांतराने दमदाटी करीत स्व:ताच्या इर्टिकाचा ताबा मिळवून वाकसरे यांची स्कार्पिओ अरबाज पठाण नामक व्यक्तीस परस्पर विक्री केल्याचे समोर आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.