नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात चार घरफोड्यांच्या घटना घडल्या असून दोन घरफोड्या भरदिवसा झाल्या आहे. या घरफोडीत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरुन नेला. या घरफोडीच्या उपनगर नाशिकरोड, म्हसरूळ व अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पहिली घटना सिडकोत घडली. एकनाथ दिगंबर पाटील (रा.पाटीलनगर,त्रिमुर्ती चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील तळ मजल्यावर राहत असून घरमालक दुस-या मजल्यावर राहतात. घरमालकाचे कुटुंबिय बाहेर गावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री घरमालकाच्या जीन्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील आणि किचनमधील लोखंडी कपाट फोडून महागड्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. घरमालक अद्याप घरी न परतल्याने मौल्यवान वस्तूंच्या किमतीचा आकडा समजू शकला नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत. दुसरी घटना मखमलाबाद भागात घडली. येथे राहणा-या चित्राबाई संजय वराड (रा.गोपाल संकुल,मानकर पेट्रोल पंपाजवळ स्वामी विवेकानद नगर,) या बुधवारी (दि.१९) नजीक राहणा-या आपल्या भावाच्या घरी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात सोनसाखळी सह दहा हजाराच्या रोकडचा समावेश आहे. वराड या सायंकाळच्या सुमारास आपल्या घरी परतल्या असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रानडे करीत आहेत. तर तिसरी घटना जेलरोड भागात घडली. उमर हनिफ शेख (रा.इंदिरानगर झोपडपट्टी,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख कुटूंबिय गेल्या शनिवारी (दि.१५) रात्री कथडा भागात मुक्कामी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्याची पोत, कानातले रिंगजोड,२० हजाराची रोकड आणि टीव्ही असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार ताजणे करीत आहेत. चौथी घटना औद्योगीक वसाहतीतील सोमेश्वर कॉलनीत घडली. अरूणा दत्ताराव पुंड (रा.मटालेनगर,सोमेश्वर कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पुंड या सोमवारी (दि.१७) दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. भरदिवसा अल्पावधीतच अज्ञात चोरट्यांनी त्याच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याची पोत आणि अंगठी असा सुमारे ४५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.