नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमा पॉलीसी बंद करून त्याचा मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने वृध्दास १८ लाख रूपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी किशोरकुमार शिवप्रसाद चौबे (६१ रा.शांती पार्क,टाकळीरोड) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलोक जैन, विवेक कश्यप, ओम भार्गव व स्वाती देसाई अशी वृध्दास गंडविणा-या संशयितांची नावे आहेत. हा प्रकार चौबे यांच्या घरी आणि आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी कॉलेज परिसरात घडला.
गेल्या १२ फेब्रुवारी रोजी चौबे यांच्याशी या भामट्यांनी मोबाईलवरून संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून चौबे यांच्या तीन विमा पॉलीसी बंद करून त्याचा चांगला मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे चौबे यांनी विश्वास ठेवला. याकाळात संशयितांनी जीएसटी, मॅच्युरिटी बेनिफीट,सिल्व्हर गोल्ड लिमीटेड क्रॉस, बोनस आदी विविध कारणे सांगून त्यांच्या सिंध अॅण्ड पंजाब बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकाच्या खात्यात वेळोवेळी तब्बल १७ लाख ८ हजार १५७ रूपये भरण्यास भाग पाडले. चौबे यांनी १२ जून पर्यंत हे पैसे बँक खात्यात जमा केले. मात्र विमा पॉलीसी बंद झाली नाही व कुठलाही मोबदला मिळाला नाही. आपण गंडवले गेल्याचे लक्षात येताच चौबे यांनी पोलिसात धाव घेतली असून, सदर नाव धारण केलेल्या संशयितांविरोधात पोलिस दप्तरी फसवणुकीचा गु्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.