नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुप्पट मोबदला देण्याचे आमिष दाखवून सिडकोतील एकास दीड लाखाला गंडा घालण्यात आला आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीवर कमिशनसह दुप्पट मोबदल्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणूकीची विवेक ओमप्रकाश सिंग (२४ रा.नेमाडे बंगल्याजवळ,मोरवाडी) या युवकाने तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंग यांच्याशी गेल्या शुक्रवारी (दि.७) रोजी भामट्यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून संपर्क साधला होता. गुंतवणुकीवर कमिशनसह दुप्पट मोबदला देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने भामट्यांच्या बतावणीनुसार एका लिंकच्या माध्यमातून आयडी व पासवर्ड तयार केला. त्यानंतर त्यांना समोरील अॅपवर संपर्क करण्यासाठी कस्टमर केअर टेलिग्राम आयडी मिळाला. त्या अॅपबाबत माहिती देवून भामट्यांनी त्यांना एकुण तीस स्टेप्स असल्याचे सांगितले. त्यात एक -एक स्टेप पूर्ण केल्यावर आपण भरलेले पैसे दुप्पट होतील व त्यावर मिळालेले वेगवेगळे कमिशन अॅप्लिकेशनच्या वॉलेटमध्ये जमा होईल. ते तुम्ही केव्हाही विड्रॉल करू शकता असे सिंग यांना सांगण्यात आले होते. सिंग यांनी स्टेप्स पूर्ण केल्या असता त्यांनी अॅक्सीस व एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून तसेच गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून एक लाख ५८ हजार ९४५ रूपये भरले. मात्र पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता ते झाले नाहीत. त्यानंतर सिंग यांनी टेलिग्राम कस्टमर केअर जीओएसएचओपी ६६ यावर संपर्क केला असता संबधितांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिंग यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.